घोडेगाव (दादासाहेब दरंदले) - माका,पाचुंदासह तालुक्यात विविध गावांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. रस्त्याच्या विकासातुनच दळणवळण वाढले की अर्थचक्रही गतीमान होते. या परिसरातील काही विकासकामे असतील तर हक्काने सांगा, ती प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील माका ते पाचुंदा रस्त्याच्या सव्वा दोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शंकरराव गडाख यांच्या हस्ते माका ता नेवासा येथे श्रीफळ वाढवुन करण्यात आला. त्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माका पाचुंदासह आसपासच्या नागरिकांनी या रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.
गडाखांनी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत वचनपुर्ती केली. शनिवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमासाठी मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, एकनाथ जगताप, सरपंच नाथा घुले, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ म्हस्के, सुदाम घुले, रमेश कराळे, देविदास भुजबळ, साहेबराव होंडे, माणिक होंडे, एकनाथ भुजबळ, सुभाष गाडे, भरत होंडे, सुखदेव होंडे, आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
रस्ते विकास ही आज काळाची गरज आहे हे ओळखुन रस्ता कसा चांगला व गुणवत्तापूर्ण होईल यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी लक्ष ठेवून सूचना कराव्यात. यापुढील काळात सातत्याने तालुक्यातील विकासकामे सोडवण्यासाठी मंत्रीपदाच्या माध्यमातुन सर्वोतोपरी प्रयत्न शासन दरबारी केले जातील, असेही ते म्हणाले.
त्या नातेवाईकांना मदतीचे धनादेश
जिल्हा रुग्णालयात झालेल्या भीषण दुर्घटनेत माका, पाचुंदा, तेलकुडगाव येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळण्यासाठी गडाखांनी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची तातडीची मदत उपलब्ध केली. या धनादेशांचे वाटप गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.