अहमदनगर - तालुक्यातील खंडाळा गावाच्या शिवारात नगर-दौंड रोडवरील हॉटेल राजयोग येथे नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी एक धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी पाच जणांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.
या हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आधी घटनास्थळी जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री करून घेतली. त्यानंतरच हॉटेलमध्ये प्रवेश करत अवैधरित्या सुरू असलेला प्रकार समोर आला आहे.
हॉटेल राजयोगमध्ये सुरू असलेले 'सेक्स रॅकेट' पोलिसांनी उजेडात आणले आहे. पोलिसांच्या छाप्यात दोन मुलींसह ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हॉटेल मालक अक्षय कर्डिले याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर मुलींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कामगिरी केली.
हॉटेल राजयोगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाेलिसांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता तेथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेल मालक काही व्यक्ती महिलांकडून वेश्या व्यवसाय करत असल्याची पोलिसांची खात्री पटली. हे हॉटेल अक्षय कर्डिले याच्या मालकीचे होते.
त्यामुळे पोलिसांनी अक्षय अनिल कर्डिले (वय २५), सौरभ अनिल कर्डिले (वय २१), संदीप पंडित जाधव (वय २३, सर्व रा. खंडाळा, ता. नगर), विकी मनोहरलाल शर्मा (वय २९, रा. आझादनगर, ता. नगर), गणेश मनोहर लाड (वय २१, रा. वाळकी, ता. नगर) यांना ताब्यात घेतले.
कर्डिले हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता हॉटेल राजयोगमध्ये महिला व मुलींना आणून त्यांच्याकडून अवैधरित्या वेश्या व्यवसाय करवून घ्यायचा. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस अधिक तपास करीत आहेत.