अहमदनगर (वाजिद शेख) - उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत अहमदनगरच्या सुदर्शन कोतकर आणि नाशिकचा मल्ल बाळू बोडखे यांची लाल मातीच्या अंतिम लढत चांगलीच रंगली. या बेमुदत लढतीत दोन्ही मल्ल एकापेक्षा एक सरस डाव टाकत होते. त्यामुळे तब्बल सव्वा तास या कुस्तीचा थरार रंगला.
एकापाठोपाठ एक सरस डाव टाकत एक मल्ल दुसऱ्याला चितपट करण्याचा प्रयत्न करत होता. आत्ता हा मल्ल चितपट झाला, असे वाटत असतानाच तो मल्ल चपळाईने सुटका करून घ्यायचा. अन् चाल करणाऱ्या मल्लाला आस्मान दाखवायचा प्रयत्न करायचा. सव्वा तास डावपेच टाकूनही कुस्ती निकाली निघत नव्हती. त्यामुळे कुस्तीप्रेमी अक्षरश: श्वास रोखून ही लढत पहात होते.
अखेर सुदर्शन कोतकर याने बाळू बोडखे (नाशिक) याला घुटना डाव टाकून चितपट केले. अन् एकच जल्लोष झाला. तोवर श्वास रोखून धरलेल्या कुस्तीप्रेमींनी सुदर्शन कोतकर याला खांद्यावर उचलून घेत एकच जयघोष केला. कुस्ती निकाली निघेपर्यंत दोन्ही मल्ल घामाघूम झाले होते. लाल चिखलात माखलेल्या दोन्ही मल्लांनी अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडले.
अखेर सुदर्शनने बाळूला घुटना डाव टाकून चितपट केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एम. निर्हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला होता.
गेले दोन दिवस सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यातील सुमारे ४११ मल्लांनी या कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. विविध वयोगटातील विजेत्यांना रोख बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सुदर्शन कोतकरला ५१ हजार रुपये रोख व चांदीची गदा देण्यात आली. तर उपविजेता बाळू बोडखे याला रोख ३१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव राजेंद्र शिरसाठ, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, मोहन हिरणवाले, ऋषीकेश ढाकणे, सिध्देश ढाकणे, माजी सभापती काशीनाथ लवांडे, पाथर्डी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे उपस्थित होते.
ही कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराने परिश्रम घेतले. कुस्ती स्पर्धेचे समालोचन शंकर अण्णा पूजारी यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून गणेश जाधव, संजय डफळ, शुभम जाधव, राहुल कापसे, चेतक बळकवडे, राम यादव, गणपत चुंबळे, सन्नी चौधरी, हरीमाना शिंदे यांनी काम पाहिले.