नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे आयपीएल २०२१ स्पर्धेचे काही सामने परदेशात खेळले गेले. परंतु, आगामी वर्षातील आयपीएल २०२२ चे सामने मात्र भारतातच खेळले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेटरसिकांसाठी ही खुशखबर आहे.
आयपीएल प्रीमियर लीगचा पंधरावी मालिका भारतातच खेळली जाणार आहे. आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी 'द चॅम्पियन्स कॉल' कार्यक्रम आयोजित करण्यात आलाह होता. यावेळी जय शाह यांनी या माहितीला दुजोरा दिला.
आयपीएलचा पंधरावा सीझन भारतात होणार आहे आणि त्यात दोन नवीन संघांची भर पडल्याने तो नेहमीपेक्षा अधिक रोमांचक असेल. तसेच या हंगामात मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळे आयपीएलसाठी नवीन टीम कॉम्बिनेशन कसे दिसते हे पाहणे मनोरंजक असेल, असेही शहा म्हणाले.
नुकताच संपलेला आयपीएल २०२१ चा हंगाम भारतात सुरू झाला होता. परंतु खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे मध्यंतरी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर, आयपीएल हंगामातील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले होते.