मुंबई - राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून कोविडबाबत वेळोवळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
एखाद्या संस्थेच्या परिसरात जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले, तर, त्या व्यक्तीवर १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कोणतीही संस्था किंचा कार्यालय मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नसेल, तर एक आपत्ती म्हणून कोविडची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, ती संस्था किंवा कार्यालय बंद केले जाईल.
वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहकांनाही ५००/ रुपये दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीज यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले, तर १० हजार रुपयांचा दंड केला जाईल. राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून येणाऱ्या प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे लागू राहतील.
जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली, तर ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. टॅक्सी, खाजगी चारचाकी वाहनात, किंवा बसमध्ये कोबिड अनुरूप वर्तनात कसूर आढळली, तर ५०० रुपयांचा दंड केला जाईल.
राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.