अलताफ कडकाले (स्पोर्ट डेस्क) - राष्ट्रीय खो-खाे स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली आहे. अटीतटीच्या लढतीत दाेन्ही संघांनी विजय संपादन करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या संघांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
हिमाचल प्रदेशातील उना येथे ३० नोव्हेंबरला ही कामगिरी पार पडली. यंदाच्या ३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडीयम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे.
मंगळवारी झालेल्या उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी तेलंगणावर तर किशोरींनी हरयाणावर विजय मिळवत रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आजच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने तेलंगणाचा ११-०३ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला.
महाराष्ट्राच्या आशिष गौतमने ३:४० मि., नाबाद १:३० मि. संरक्षण करून २ गडी बाद केले, कर्णधार सोत्या वाळवीने २:५० मि. संरक्षण करून १ गडी बाद केला, अथर्व पाटीलने १:३० मि. संरक्षण करून २ गडी बाद केले व हाराद्या वसावेने १:३० मि. संरक्षण करून १ गडी बाद केला व संघासाठी विजय सोपा केला.
तर पराभूत तेलंगणाच्या के. शरण व व्ही. कुमारने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. के शरणने १ मि. ४० सें. संरक्षण केले तर उर्वरित खेळाडूंना मैदानात टिकाव धरता आलेला नाही. त्यामुळे तेलंगाणाने महाराष्ट्रासमोर सपशेल शरणागती पत्करली.
महाराष्ट्राच्या किशोरींनी उपउपांत्य फेरीच्या सामन्यात हरयाणावर ११-०९ असा एक डाव २ गुणांनी मोठा विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या सानिका चाफेने कर्णधाराची खेळी खेळताना ४:०० मि. संरक्षण करून ३ खेळाडू बाद केले, तिला उत्कृष्ट साथ देताना अंकिता देवकरने १:४० मि. संरक्षण करून ३ खेळाडू बाद केले.
सुषमा चौधरीने १:४० मि. संरक्षण करून १ खेळाडू बाद केला, तर साई पवारने १:४० मि. संरक्षण केले व मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर हरयाणाच्या मुस्काने १ मि. ४५ सें. संरक्षण करत २ खेळाडूंना बाद केले. तर प्रीती व रेणु यांनी चांगला खेळ केला.
किशोरांच्या इतर सामन्यांचे निकाल
प. बंगालने कोल्हापूरचा १२-११ असा एक १:३० मि. राखून पराभव केला. कर्नाटकने विदर्भाचा २४-१५ असा धुव्वा उडवला. राजस्थानने तामिळनाडूवर १३-०८ असा विजय मिळवला. छत्तीसगडने आंध्र प्रदेशचा १०-०९ असा ६:०० मि. राखून पराभव केला. तेलंगणाने उत्तराखंडचा ११-१० असा ५:१० मि. राखून पराभव केला तर हरयाणाने दिल्लीचा १८-१४ असा पराभव केला.
किशोरींच्या इतर सामन्यांचे निकाल
कोल्हापूराने उत्तर प्रदेशवर ०९-०८ असा निसटता विजय मिळवला. हरयाणाने तेलंगणावर १०-०१ असा मोठा विजय मिळवला. दिल्लीने केरळचा २०-६ असा पराभव केला.