मुंबई - शिवसेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपला फसवून मुख्यमंत्री (Chief Minister) झाले आहेत, असा आरोप भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे म्हणत राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
राणे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदत (Press Conference) घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी (Cheating) करून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलीच टीका केली. रात्री जे करायचे ते दिवसा करताना त्यांना भान रहात नाही, अशी टीका त्यांनी केली.
राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. जगाचा पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही, असे राणे म्हणाले. शरद पवार यांच्यासारखा लाचारपणा आमच्यात नाही, असा टोलाही त्यांनी लावला. मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यापुढे लाचार होत मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले, असा आरोपही राणे यांनी केला.
संजय राऊत यांना आव्हान देताना राणे म्हणाले, आधी तुमचा खासदार (MP) टिकवा, मग बोला. नाहीतर तुम्हाला नंतर कळेल की तो भाजपमध्ये गेला आहे. राऊत यांनी बडबड बंद करुन कामे करावीत, असेही राणे म्हणाले. नैतिकता असेल तर महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असेही राणे म्हणाले.