अहमदनगर - नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीतून विरोधकांनी आधीच माघार घेतल्याने गांधी गटाच्या सहकार पॅनेलसाठी ही निवडणूक एकतर्फी झाली. चार जागांवर यापूर्वीच गांधी गटाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. उर्वरीत १४ जागांच्या मतमोजणीतही सर्व जागांवर सहकार पॅनेलनेच विजय मिळवला.
अर्बन बँकेच्या १८ जागांसाठी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरीत १४ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. रविवारी (२८ नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली.
अवघ्या ३१.७५ टक्के मतदार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजल्यापासून अमरज्योत लाॅन येथे झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने आघाडी घेतली. विरोधी अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला.
सहकार पॅनलच्या उमेदवारांना पडलेली मते
शहर विभागात विजयी उमेदवार अजय बोरा - १६,३२३, अनिल कोठारी - १६,१७४, ईश्वर बोरा - १६,१४९, गिरिष लाहोटी - १५,७३८, दीप्ती गांधी - १६,१७१, महेंद्र गंधे - १५,८८५, राजेंद्रकुमार अग्रवाल - १५,८६१, राहुल जामगावकर - १५,८०६, शैलेश मुनोत - १५,९६३, संपतलाल बोरा - १५,३२५ मते मिळवून विजयी झाले.
शाखा विभागात विजयी उमेदवार
कमलेश गांधी - १६,३७२, अतुल कासट - १५,९२५, अशोक कटारिया - १५,९७५, सचिन देसरडा - १५,८६० हे उमेदवार विजयी ठरले. पराभूत अपक्ष उमेदवारांना शहर विभागात अनिल गट्टाणी - १,५२०, दीपक गुंदेचा - २,५०३, स्मिता पोखरणा - १,५६६, संजय ढापसे - १,०३९, गणेश राठी - १,५२४, रज्जाक इनामदार - ७७७, रमनलाल भंडारी यांना १,४३३ मते मिळाली.
बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलचे बँकेवर एकहाती वर्चस्व मिळाल्याने आता अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवड बुधवारी (दि. १ डिसेंबर) होणार आहे.
अध्यक्षपदासाठी दिप्ती गांधी, शैलेश मुनोत, अनिल कोठारी यांची तर उपाध्यक्षपदासाठी मनेष साठे यांचे नाव चर्चेत आहे. या निवडणुकीचा अधिकृत निकाल निवडणूक अधिकारी दिग्वीजय आहेर बुधवारी सभेचे आयोजन करून त्यातच अधिकृत निकाल घोषीत करणार आहेत.
विरोधकांची ऐनवेळी माघार
बँकेच्या राजकारणात विरोधी पॅनेल असलेल्या बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी दोन वर्षांपासून विरोधात भूमिका मांडली. या निवडणुकीत बँक बचाव कृती समितीनेही उडी घेतली, मात्र अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी मंडळाने सर्व अर्ज मागे घेतले. त्यामुळे रिंगणात राहिलेल्या सात अपक्ष उमेदवारांना किती मते मिळणार याची उत्सुकता होती.