हायस्कुलचं (शाळे) प्रवेशद्वार म्हणजे आठवणींच्या विश्वात नेणारे प्रवेशद्वार.. ते गेले कित्येक वर्षे खुणावत राहिले आणि यापुढेही खुणावत राहिल.. अगदीच घरापासून २० ते २५ पावलं दूर. भविष्यातल्या स्वप्नांची वीण तिथंच बांधली गेली. पूर्वी हायस्कुलमध्ये प्रवेश म्हणजे जणू तो उत्साह वेगळाच असायचा..
अनामिक नाही तर प्रचंड भीती होती. का तर गणिताचे लसावी, मसावी, भागाकार करत फेर धरणार आणि इंग्रजीची बोबडी वळत पट्टा चालू होणार.. मात्र हे चुकणार नव्हतं हे कळलं होतं. पावलं पडायला लागली तेव्हापासून समोर रोज दर्शन देणारं हायस्कुलचं प्रवेशद्वार..
कळतं झाल्यावर आपलंही इथंच ऍडमिशन. मोठ्या बहीण-भावाप्रमाणे आपणही शाळेचा ड्रेस, नवीन दफ्तर घेऊन इथे जाणार. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक हे एक कुतूहल. आणि विशेष म्हणजे हायस्कुल हाकेच्या अंतरावर. बेल वाजली की मग अथरूणातून उठायचं ही आपली (तेव्हाची )ओळख.
हाकेच्या अंतरावर हायस्कुल असल्याचा मला त्याकाळी प्रचंड त्रास सहन करावा लागला. कधी खोटं बोलून दांडी मारता आली नाही, की आपण गृहपाठ केला परंतु वही घरी विसरली हे की सांगायची सोय उरली नाही आणि हे एक की आपल्या प्रिय गुरुजी, बाईंसाठी हवी असणारी वस्तू घेऊन जा..
कधी अभिमानानं कॉलरवर व्हायची. तरी तो मानसिक त्रास कधी आनंद देऊन जायचा. आयुष्यातील मित्र - मैत्रीची साथ जोपासायची कशी, हे या हायस्कुलनं शिकवलं. घराच्या ४ भिंतीपासून लपवत रट्टा खाणारे आपण हायस्कुल हाकेच्या अंतरावर. हा एका शाप वाटायचा.
एक मात्र पोटात गोळा आला की घंटा वाजते न वाजते तर आपला गृह प्रवेश. हक्काचा. चोवीस तास समोर नाचणाऱ्या या प्रवेशद्वाराने काळजावरही आपलेपणाचे तेवढेच वार केले. भविष्याच्या दिशेनं स्वप्नवत का होईना बघण्याचा दूरदृष्टीकोन दिला.
आपल्या पूर्वीच्या चुका पोटात घालून आज हक्काने विचारपूस करणारी माणसे या ठिकाणी आपल्या जीवनात सामावली. काहींसाठी ही फक्त शाळा असेल.. मात्र आपल्यासाठी हे हायस्कुलचं प्रवेशद्वार आठवणींचा हिंदोळा बनून मनावर अधिराज्य गाजवतंय. आजही, अविरतपणे..
- आरती खोजे-दिवटे (औरंगाबाद)