माझा मित्र मेहमूद शेख यांच्यासोबत त्यांच्या कौटुंबिक कामासाठी अहमदनगर जिल्हयातील सुपा ता. पारनेर येथे गेलो होतो. नगर शहरापासून 28 किलोमिटर अंतरावर असलेले सुपा ऐतिहासिक काळातील गाव आहे. येथील अनेक खुणा त्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत.
या निमित्ताने येथील रहिवासी व इतिहासावर प्रेम करणारे इतिहास अभ्यासक माझे स्नेही बाळासाहेब शहाणे यांची भेट झाली. आपल्या शहराच्या इतिहासावर प्रेम करणारी, त्यांचे जतन होण्यासाठी धडपडणारी माणसे पाहिली की आनंद वाटतो. बाळासाहेब त्यापैकीच एक...
त्यांच्यासोबत येथे फेरफटका मारताना त्यांनी येथील पवारांची गढी, वेस, दक्षिणमुखी मारुती मंदिर अशा काही ऐतिहासिक वास्तू दाखवल्या.. इतिहासाची साक्ष देत असलेली पवारांची गढी जीर्ण, खिन्न अवस्थेत कशीबशी उभी आहे. ती ही केवळ भिंती असल्यामुळे.. ज्या ही केव्हाही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.
एकेकाळी समृद्ध अवस्थेत असलेली ही गढी इथल्या श्रीमंतीची ओळख होती. गढीत राहणाऱ्या संपन्न कुटुंबांची ती ओळख होती. आज गढी पाहिली.. पूर्वीपासून गढी अशी ओळख असलेली ही वास्तू आज अतिशय पडक्या, काटेरी जंगलाच्या विळख्यात असलेली, झाडाझुडुपा व्यतिरिक्त काहीही शिल्लक न राहिलेली. तरीही पडक्या अवशेषांवर उंचावर एखादी नक्षीकाम केलेली भिंत दिसावी.. तिने आपली पूर्वीची ओळख द्यावी... बस् एवढेच..
या गढीची अवस्था पाहून खूप दुःख झाले. चारशे वर्षांपूर्वी शाबुसिंग पवार महाराज यांनी ही वास्तू उभी केली होती. शाबुसिंग हे मध्यप्रदेशातील धार, देवास येथून आलेले राजेशाही व्यक्तिमत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याण येथे सिध्दी जोहर विरोधात लढाई झाली असताना महाराजांना या लढाईत शाबुसिंग यांनी मोठी मदत केली होती.
महाराजांनी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर येथे धावती भेटही दिली आहे, असेही बाळासाहेब यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी सांगितले. येथील पारनेर रस्त्यावर शाबुसिंग पवार महाराजांची समाधी आहे. महाराजांचे वारसदार व इतिहास प्रेमी हे याची देखभाल करतं आहेत. गढी परिसरात शितोळे कुटुंबिय रहातात.
मल्हारराव शितोळे शिबुसिंग महाराजांचे मूनिमजी होते तसेच जवळचे नातेवाईकही होते. त्यांच्याच कुटुंबातील नारायणराव शितोळे यांचे नातू व कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. जवळच सुंदर वेस आहे. वेशीच्या आत पुरातन दक्षिण मुखी मारुती मंदिर पहायला मिळाले. आपल्या देशात अनेक शहरांत ऐतिहासिक वास्तूंची जपणूक, त्यांचे संवर्धन केले जाते. खरेतर ही आजच्या काळाची गरज आहे.
आपला देश विविध संस्कृती प्रधान देश आहे. परदेशात अशा ऐतिहासिक वास्तूंचे मनापासुन जतन केले जाते. म्हणूनच ती शहरे जगातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनली आहेत. आपला जिल्हा इतिहासात संपन्न होता. हे निजामशाहीच्या राजधानीचे समृद्ध शहर होते. पण दुर्दैवाने या इतिहासाची आपण जपणूक करू शकलो नाही. यांचे संवर्धन केले असते तर अहमदनगर पर्यटनाच्या नकाशावरील प्रमूख शहर असते.
बाळासाहेब शहाणे इथला इतिहास जपायला हवा ही भावना मनात ठेवत प्रशासन दरबारी मनापासुन प्रयत्न करीत आहेत... आजचा दिवस आमच्यासाठी बाळासाहेबांनी कृतकृत्य केला होता. इतिहास जपायलाच हवा. ती तर आपली प्रेरणा आहे. श्वास आहे. काळाच्या ओघात त्या नष्ट होऊ नयेत, हीच प्रार्थना.
- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रुप, अहमदनगर)