मुंबई - भाजपचे नेते किरीट साेमय्या हे गेले काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मागे हात धुवून लागले आहेत. एकापाठोपाठ एका नेत्यांचा आणि मंत्र्यांचे घोटाळे असल्याचे ते जाहीर करत आहेत. आता ऐन दिवाळीत त्यांनी आणखी तीन मंत्र्यांचा जीव टांगणीवर ठेवला आहे.
किरीट सोमय्या यांनी तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. हे तीनही मंत्री असे तसे नाहीत, तर बडे मंत्री आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. राजकारणात गेले काही दिवसांपासून सूचक वक्तव्य करत आपण दिवाळीत बॉम्ब फोडणार असल्याचे इशारे दिले जात होते. या मैदानात आता किरीट सोमय्या देखील उतरले आहेत.
येत्या एका महिन्यात ते राज्यातील ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. तसा इशाराच त्यांनी दिला आहे. आता हे मंत्री कोण, याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. नेमके कोणत्या बड्या मंत्र्यांचे पितळ ते उघडे पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ज्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, त्यांचे राज्यातील राजकारणात चांगले वजन आहे. ते दिवाळीत फटाके फोडणार असल्याची भाषा करतात. पण त्यांना माहित नाही की किरीट सोमय्या वर्षभर फटाके फोडत असतो, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.