'चंद्रू'च्या डोळ्यांतले अश्रू तुझ्या-माझ्या डोळ्यांत कधी येणार..?

(दैनिक दिव्य मराठीचे स्टेट एडिटर संजय आवटे यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार..)

सिनेमा संपला, पण 'जय भीम' चा ॲडव्होकेट चंद्रू डोळ्यांसमोरून जाईना. चंद्रूची 'लॉ'ची डिग्री कोणालाही मिळेल. वकील झाल्यानंतर तसा कोटही शिवून मिळेल. पण, त्या फाटक्या आदिवासी माणसांसाठी याच्या डोळ्यांत तरळलेले पाणी कोण देईल?

आपल्या मस्तीत आणि आपल्याच दुःखात मश्गुल असणारे आपण कोणाचं दुःख पाहून असे व्याकुळ होऊ शकतो? कोणावरचा अन्याय पाहून पेटून उठू शकतो? आपल्याला फक्त कोणी 'गुड मॉर्निंग' म्हटले नाही, म्हणून संतापणा-या आयपीएस अधिका-याला, कोणावर होणारा अत्याचार बघून भयंकर राग कसा येत नाही? 

आपण हसतो. रडतो. संतापतो. प्रेम करतो. कोसळतो. प्रतिकार करतो. उभे राहातो. पण या सगळ्याचा केंद्रबिंदू एकच असतो - तो म्हणजे मी. हे स्वभान एवढे आक्रसलेले कसे असते? त्या आदिवासी पोरांना कोठडीत मरेपर्यंत बेदम मारणारा पोलीस अधिकारी घरी आल्यावर बायकोवर प्रेम करत नसेल? 

या अत्याचाराला पाठीशी घालणारा ॲडव्होकेट जनरल आपल्या मुलांवर माया करत नसेल? मुलीला काही खरचटले, तर रडत नसेल तो? तोही रडतो. चंद्रूही रडतो. पण मग अश्रू असे सिलेक्टिव्ह का? 

आयपीएस, आयएएसच्या परीक्षेत हे कसे मोजले जात नाही? ज्यांचा 'स्व'च विस्तारत नाही, ते कसे सार्वजनिक सेवेत काम करू शकतील? एवढ्या मार्कांनी पास झालेला, 'सक्सेस स्टोरी' असलेला परमवीर कसा काय फरार होऊ शकतो? फरार तर करूणा झाली आहे, जी चंद्रूकडं आहे. ही करूणा का कोणी शिकवत नाही? का कोणी तपासत नाही ? 

एक मैत्रीण खूप हळवी. जरा काही झालं की टचकन डोळ्यात पाणी. लग्न झालं. धनाढ्य नवरा. एक-दोनदा भेटली. पण, तशीच हळवी वाटली. ती स्वतःही तिच्या या हळवेपणाचं कौतुक सांगत असते. तिच्या घरी जेवायला गेलो. तर, तिच्या कामवाल्या मावशीला अचानक चक्कर आली. डोळे पांढरे केले बाईने. 

आम्ही मित्र पटकन धावलो. तिला पाणी वगैरे दिलं. घाईत ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. तर हिने तोवर सिक्युरिटीला फोन केला. "या मावशीला इथून घेऊन जा. तिच्या घरी घेऊन जा. इथं तिला बघून मला त्रास होतोय. काही बरं-वाईट झालं तर आम्हाला ताप." आम्ही थक्कच झालो. 

त्यावर ती म्हणते - "तुला माहीत आहे ना, मला असलं सहन होत नाही. मी किती इमोशनल आहे, माहीत नाही का तुम्हाला?" आम्ही त्या मावशींना दवाखान्यात घेऊन गेलो, हा मुद्दा वेगळा. पण, हा कसला सिलेक्टिव्ह हळवेपणा?  सिलेक्टिव्ह इमोशन्स !

हा 'स्व' विस्तारत का नाही आपला? कौशल्ये शिकवली जातात. आत्मविश्वास वगैरे शिकवला जातो. अभिव्यक्ती शिकवली जाते. पण, याचं काय करायचं? 

व्यक्तिगत मोक्षासाठी झगडणं हाही स्वार्थच आहे, असं बुद्ध म्हणत असत. प्राचीन बौद्ध परंपरेतील 'थेरवाद' हा 'प्रज्ञा', 'शील', 'समाधी' असे त्रिरत्न मानतो. बुद्धाने मात्र समाधी नव्हे, 'करूणा' सांगितली. दुसऱ्यांचा दुःखहार करण्यात जो आनंद आहे, तो मोक्षापेक्षा मोठा आहे. 

ज्ञानदेवाने मागितलेले पसायदान आणखी वेगळे कोणते आहे? भिंत चालवणारा ज्ञानेश्वर खरा नाही. तर पूल बांधणारा ज्ञानेश्वर खरा.  

आतां विश्वात्मके देवे,

येणे वाग्यज्ञे तोषावे,

तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||


असे 'जो जे वांछिल तो ते लाहो' आळवणारा ज्ञानेश्वर विश्वात्मक न झाला तरच नवल. हे 'भूतापरस्परे जडो मैत्र जिवांचे' का नाही समजत आपल्याला?

समर्थ रामदास तरी आणखी काय मागतात त्या रामाकडं? स्वतःसाठी मागत नाहीत काही. 'बहुजनमैत्री' मागतात.

 हितकारक दे रे राम। 

जनसुखकारक दे रे राम।।

अंतरपारखी दे रे राम।

बहुजनमैत्री दे रे राम ।।

करूणा म्हणजे परोपकार वा भूतदया नव्हे. मुळात, तो 'स्व'चा विस्तार आहे. तुझ्या दुःखासाठी माझ्या डोळ्यांत पाणी येणं आहे. तुझ्यावरच्या अन्यायामुळं मी संतापणं आहे. तुझ्यासाठी मी उभं राहाणं आहे. 

सरदाराच्या घरात सुखात जगणा-या शिवबाला कशाला स्वराज्य उभं करायचं होतं? मस्त कंत्राटदार असलेल्या ज्योतिराव फुल्यांना कशासाठी जगाला हौद खुला करायचा होता? साक्षात राजा असलेल्या शाहूंना गोरगरीब पोरा-पोरींना का शिकवायचं होतं? हीच ती करूणा आहे, जी तुमचा 'स्व' विस्तारते. 

मग आकाशाएवढा झालेला तुकाराम सांगतो,

जे का रंजले गांजले ।

त्यासि म्हणे जो आपुलें ॥

तो चि साधु ओळखावा ।

देव तेथेंचि जाणावा ॥

या रंजल्या गांजल्यांसाठी कोणी भीमराव आंबेडकर उभा राहातो. त्यांना आपला आवाज देतो. त्यांची लढाई लढतो. त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी संविधान देतो. नवरा मेला की बाईचं डोकं जे भादरत, त्या न्हाव्यांना संपावर पाठवणा-या ज्योतिबांची करूणा कोणती? त्या मायमाऊली ना त्याच्या नात्यातल्या, ना जातीतल्या. पण, याचा जीव तुटतो. हा उभा ठाकतो. 

जगात ही करूणा नसती, तर तुम्ही ज्याला तुमचं जग मानता, ते तरी असतं का? तुमचं घर उभं असतं का? या करूणेमुळंच तर आला आहात तुम्ही इथवर. किती आक्रसून टाकलंय आपण स्वतःला? समोरच्या घरात दिसणा-या आगीचे लोळ लांबून कितीही वेधक वाटले, तरी ते तुझ्या घरात येणार आहेतच. 

"वी हॅव शेअर्ड डेस्टिनी'... 

पण, आपण आहोत आपल्याच विश्वात मश्गुल. 

चंद्रू नावाचा नायक उभा राहिल्यावर टाळ्या पिटतो आपण, पण चंद्रूच्या डोळ्यांतले अश्रू तुझ्या-माझ्या डोळ्यांत कधी येणार? कसे येणार?

- संजय आवटे 

(लेखक दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाच्या 'दैनिक दिव्य मराठी'चे स्टेट एडिटर (राज्य संपादक) आहेत)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !