जय भीम.!
मला वास्तववादी आणि सत्य घटनांवर आधारित असलेले चित्रपट (Cinema) पाहायला आवडतात. त्यामुळे 'जय भीम' (Jai Bhim) या चित्रपटाचा (Movie) 'ट्रेलर' (Trailer) पाहिला, तेव्हापासूनच हा चित्रपट काहीतरी भन्नाट घेऊन येणार याबाबत शंका नव्हती. रात्री पूर्ण पावणेतीन तास खर्च करून चित्रपट बघितला.
चित्रपटातले काही दृष्य हे माणसाला अक्षरश: अस्वस्थ करतात. वास्तवाची जाणीव करून देतात. 'स्त्री'च्या सहनशीलतेचे आणि खाकीतल्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवतात. जातिव्यवस्थेमुळे अत्याचार, जुलूमशाही, गुलामगिरीचे शिकार ठरणाऱ्या हाडामासाच्या माणसांच्या व्यथा, वेदना पाहून तुमच्यातला माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही.
मला तर अक्षरशः काही सीन बघवले गेले नाही. बाकी या चित्रपटात कलाकारांनी साकारलेल्या भूमिका व अभिनयाला तोड नाही. "सबसे बडी योद्धा माँ होती है" हे लिजोमोल जोस हिने साकारलेल्या (गर्भवती पत्नीच्या) भूमिकेने पुन्हा एकदा सिद्ध झाले. सूर्याने (सूर्या) साकारलेली वकिलाची भूमिका तर माझ्यासारख्या तरुण वकिलांसाठी दिशादर्शक ठरणारी आहे.
चित्रपटाची कथा आणि वास्तव यावर बोलायचं म्हटलं तर चित्रपट 1994-95 मधील घटनेवर आधारित आहे, मात्र इतक्या वर्षानंतर आज या परिस्थितीत कितपत सुधारणा झाली, हे जाणून घ्यायचे असेल तर शहरातल्या झोपडपट्टय़ा, आणि गावच्या वेशीबाहेर झोपड्या बांधून आपले जीवन व्यथित करणार्या विशिष्ट समाजाचे लेबल गोचीडासारखे चिकटलेल्या भारतीय नागरिकांना अवश्य भेटायला हवं.
म्हणजे वास्तव आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता-जाणता येईल. हा सिनेमा नक्की पहावा असाच आहे. मला हा सिनेमा आवडला. तुम्हीही नक्की पहा..
- Adv. प्रतिक्षा काळे (यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार)