मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी ही माहिती दिली आहे. अत्ताउल्हा याच्या व्यवसायाच्या नावाने थोडेथिडके नाही, तर कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणातून ही बाब निदर्शनास आली आहे. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजानन एंटरप्रायझेस, या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी केली. तसेच GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.
ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीचे कोणतेही व्यवहार करत नव्हती. तरीही मोठ्या प्रमाणावर खोटी बिले / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. १०५ कोटी रक्कमेची खोटी देयके दाखवली.
कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. १८.९१ कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स प्राप्त करून घेतला. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा २०१७ चे कलम १३२ (१) (ब) व (क) नुसार गुन्हा आहे.
यानुसार कमीत कमी ६ महिने, जास्तीत जास्त ५ वर्ष तुरूंगवास, आणि दंड- इतक्या शिक्षा होऊ शकते. तसेच या कायदयाच्या कलम १३२ (५) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे. त्यामुळे अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून तत्काळ अटक करण्यात आली आहे.
अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोणतेही व्यवहार नसताना इतकी मोठी बिेले कशासाठी बनवली, किंवा खरेचच हे व्यवहार झाले का, जर झाले असले तर कोणासोबत व कशासाठी झाले, याबाबत त्याची अधिक सखोल चौकशी केली जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करदात्यांना आवाहन केले आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.