टी-ट्वेंटी - विश्वचषक क्रीडा स्पर्धेत भारताला सलग दोन दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तान आणि न्युझीलंड या दोन संघांनी भारतीय संघाला पराभूत केले होते. परंंतु, तिसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघाला स्वत:ची लाज राखता आली. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा तिसरा सामना स्कॉटलंडविरूद्ध झाला. त्यात भारत विजयी झाला.
भारतीय गोलंदाजांचा मारा स्कॉटलंडविरू्ध चांगलाच वेगाने चालला. परिणामी भारतीय संघाने स्कॉटलंडला अवघ्या ८५ धावांतच गारद केले. यामुळे भारताला या स्पर्धेत स्वत:ची लाज राखता आली. उत्तरादाखल भारताने बारा षटकांमध्येच हे लक्ष्य गाठले आणि विजयाची पताका आपल्या नावावर कोरली.
विशेष म्हणजे, या विजयामुळे भारताच्या या स्पर्धेतील मावळलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. स्कॉटलंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवल्याने भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही वाढल्या आहेत.
भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज बॅटिंग करत आव्हान पूर्ण केले. लोकेश राहुलने फक्त १९ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, तर रोहित शर्माने १६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या. सहज विजयाला गवसणी घातली.