अहमदनगर - पत्नीचा हट्ट पुरवणारे पती आपण सहसा पाहतो. पण पत्नी नवऱ्याच्या संसारात साथ देत नसेल, अन् त्रासदायक अटी घालत असेल, तर पती कुठल्या टोकाला जाईल, याची प्रचिती नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा या गावात दिसून आली आहे. पत्नीसाेबत वारंवार होणाऱ्या भांडणाला वैतागून पतीने टोकाचे पाऊल उचलले.
माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने, तसेच आई-वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत असल्याने पतीने आत्महत्या केली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या कालावधीत नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घडला.
गोपीचंद रोहिदास भोसले (वय - ३० वर्षे, रा. पिपंळगाव कौडा, ता. नगर) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गोपीचंद याची आई कमल रोहिदास भोराले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोपीचंदच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, गोपीचंदचा विवाह श्रुती कैलास चव्हाण (रा. वडारवाडी, भिंगार, ता. नगर) हिच्याशी झाला. पण, लग्नानंतर तिचे गोपीचंद याच्याशी कायम भांडण व्हायचे. भांडण झाल्यानंतर ती नेहमी रागारागाने तिच्या माहेरी वडारवाडी, भिंगार येथे निघून जात असे.
काही दिवसांपूर्वी असेच भांडण करुन ती माहेरी गेलेली होती. गोपीचंदने तिला परत नांदायला येण्याचा आग्रह धरला. पण, सासरी येण्याच्या मोबदल्यात श्रुती तिच्या आई वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळेे तिच्या त्रासाला कंटाळून गोपीचंद याने राहत्या घरात छपराला गळफास घेवून आत्महत्या केली.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेद्र सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्यासोबत फौजदार चव्हाण आणि महिला पोलिस कर्मचारी गायकवाड होत्या. या गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चव्हाण हे करीत आहेत.