मुुंबई - त्रिपुरा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.
तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गृहमंत्री हे राज्यातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवूून आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे पोलिसही याबाबत खबरदारी घेत आहेत.
अहमदनगरमध्ये अतिरिक्त पाेलिस बंदोबस्त
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोठेही अनुुचित प्रकार घडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहेे. शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्यातील काही शहरांत शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चाला नांदेड, मालेगाव, अमरावती आणि आणखी काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यात काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जनतेला एकोपा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.