अहमदनगर - मुळा एज्युकेशन संस्थेतील क्लार्क प्रतीक बाळासाहेब काळे या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. प्रतीकने आपण सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
याप्रकरणी प्रतिकच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी ४ जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये महेश कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल राजळे, व्यंकटेश बेल्हेकर यांचा समावेश आहे. आरोपी विनायक देशमुख याला रविवारी सायंकाळी तर व्यंकटेश बेल्हेकरसह इतर तीन जणांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
या चौघांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता या चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.