सुरत - दिवाळीचा सण आला की विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि गिफ्टचे वेध लागतात. काही कंपन्या दरमहा पगारापेक्षाही अधिक रक्कम बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देते. तर महागडे गिफ्टही दिले जातात. गुजरात राज्यातील अशीच एक कंपनी या कारणामुळे लक्ष्यवेधी ठरली आहे.
या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आगळेवेगळे गिफ्ट दिले आहे. गुजरातच्या या कंपनीने आपल्या कमर्चाऱ्यांना चक्क स्कूटर गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या स्कूटर इलेक्ट्रिक असल्यामुळे कमर्चाऱ्यांना वाढत्या पेट्रोल दराची चिंता भासणार नाही.
सुरतमध्ये असलेल्या कंपनीने वाढत्या पेट्रोल दरामुळे हा निर्णय घेतला आहे. 'अलायंस ग्रुप' असे या कंपनीचे नाव आहे. अलायंस ग्रुपचे संचालक सुभाष डावर यांनी ही माहिती दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हेे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला, असे तेे म्हणाले.
ही कंपनी एम्ब्रॉयडरी मशीनचा व्यवसाय करते. सुभाष डावर यांचा मुलगा चिराग याच्या हस्ते कंपनीतील ३५ कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले आहे. या आगळ्यावेगळ्या गिफ्टमुळे ही कंपनी सध्या गुजरातसह देशभरात चर्चेत आहे.