मुंबई - घोडेगाव (ता. नेवासा) येथील सिनेकलाकार भारत यलाप्पा फुलमाळी यांना नुकताच मानाचा ‘दादासाहेब फाळके आयकॉन फिल्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या आगामी ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ या सिनेमातील उत्कृष्ट सहायक अभिनयासाठी त्यांना गौरवण्यात आले.
फिल्म असोसिएशन आणि डीपीआयएफ-रोटी कपडा बँकेच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील विलेपार्लें येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. सिनेअभिनेते सुनील पाल यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट, ज्येष्ठ अभिनेत्री मीता वशिष्ठ, पूनम धिल्लन, यांसह अनेक दिग्गज कलाकार व सिनेसृष्टीशी निगडित मान्यवर उपस्थित होते.
मी ग्रामीण भागात राहातो. त्यामुळे मी अभिनयाचे शिक्षण घेऊ शकलो नाही. तरीही दिग्दर्शक सुरेश झाडे (भावसार) यांनी मला संधी दिली. त्यामुळे मी मनापासून त्यांचा आपणा सर्वांचा आभारी आहे. सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, ही आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. सदाशिव अमरापूर यांच्या जिल्ह्यातील असल्याचा मला अभिमान आहे. हा मला प्रेरणा देणारा आहे, असे भारत फुलमाळी म्हणाले.
सिनेक्षेत्रात काम करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. ग्रामीण भागातील अनेक युवक मोठ्या शहरात जाऊन नशीब आजमावतात. पण सगळेच यशस्वी होतात, असे नाही. कारण सिनेसृष्टीत जितके ग्लॅमर आहे, तितकाच खडतर प्रवासही आहे. भारत यलाप्पा फुलमाळी यांचा प्रवासही असाच आहे.
दिग्दर्शक सुरेश शंकर झाडे यांनी भारत फुलमाळी यांना पहिली संधी दिली होती. नंतर त्यांच्या तीन सिनेमांत भारत यांना पुन्हा संधी मिळाली. शनिशिंगणापूर येथे एका भोजपुरी सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. लहानपणापासून सिनेमाची आवड असलेले भारत तेथे शुटिंग पहायला गेले होते.
गर्दीत असलेल्या भारत यांना दिग्दर्शक सुरेश शंकर झाडे (भावसार) यांनी सिनेमात काम करणार का? असे विचारले. सिनेमाची आवड असली, तरी अभिनयातले काही येत नसल्याचे भारत यांनी त्यावेळी प्रांजळपणे नमूद केले. दिग्दर्शक झाडे यांनी भारतला ‘माणूस : एक माती’ या सिनेमात सहायक खलनायकाची भुमिका दिली.
या सिनेमात भारत यांना मराठीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव, गणेश यादव, रुचिता जाधव यांच्यासोबत अभिनय साकारला. भारत फुलमाळी यांनी ‘रेबिज’, ‘माझी काय चूक’, ‘त्रिकोणाची चौथी बाजू’, ‘गणवेश’, या लघुपटांत काम केले आहे.
ग्रामीण भागातील कलाकाराने सिनेक्षेत्रात भरारी घेतल्यामुळे मित्रपरिवार, ग्रामस्थ व परिसरातून भारत फुलमाळी यांचे खुप कौतुक होत आहे. घोडेगाव ग्रामस्थांनी त्यांंच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'व्हिडिओ थिएटर ते मोठा पडदा'वर प्रवास
भारत यांना शालेय जीवनापासून सिनेमाची प्रचंड आवड होती. गावात दोन रुपये तिकिट असलेल्या व्हिडिओ थिएटरमध्ये त्याने शेकडो सिनेमे पाहिले. नव्वदीच्या दशकात अमिताभ बच्चन आणि मिथून चक्रवर्ती ज्या युवकांचे प्रतिनिधीत्व करत आले, त्यांच्यात आणि भारतच्या आयुष्यातही साम्य हाेते. त्यामुळेची सिनेमाची आवड निर्माण झाली. भारत यांचा त्या थिएटरपासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
सामाजिक विषयावर भाष्य
भारत फुलमाळी यांचा आगामी ‘प्लेज टू प्रोटेक्ट’ हा हिंदी सिनेमा मुंबईत घडलेल्या एका सत्यकथेवर आधारित असून सामाजिक व संवेदनशील विषयावर भाष्य करणारा आहे. भारत यांनी त्यात सहायक खलअभिनेता साकारला आहे. तुर्की, फ्रान्स देशातील फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला.
गोल्डन व्हीट अॅवॉर्ड
तुर्कीमध्ये या सिनेमाला ‘गोल्डन व्हीट अॅवॉर्ड’ मिळाला आहे. या सिनेमात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, मुख्य अभिनेता अँथनी थॉमसन, गणेश यादव, भक्ती चव्हाण, सुनील पाल, आदित्य सुुरेश झाडे यांच्यासह अभिनय साकारला आहे. सुरेश शंकर झाडे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अँथनी थॉमसन यांनी केली आहे.