बापरे ! नगर जिल्ह्यातील 'या' परवानाधारक दुकानांत 'दारूमध्ये भेसळ..'

अहमदनगर – उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात एकाच वेळी चार ठिकाणी परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापे टाकले. यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या दारू दुकानांमध्ये देशी दारूमध्ये भेसळ होत असल्याचे उत्पादन शुल्क विभागला दिसून आले आहे.


उत्पादन शुल्क विभागाने नेवासा, नेवासा फाटा, सलबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापे टाकले. या दारू दुकानांमधून बनावट दारू विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे रविवारी रात्री एकाच वेळी वेगवेगळ्या पथकाने ही कारवाई केली. 

अशी करायचे भेसळ

परवानाधारक दुकानांवर उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले. तेथे काही आरोपी रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीलबंद बाटल्यांमधील काही दारू काढून त्यात पाणी भरून पुन्हा सील करत होते. त्यामुळे काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

नेवासा फाटा येथील परवानाधारक रवींद्र कत्तेवार दारू दुकानात पथकाने छापा टाकला. आरोपी प्रशांत सोडा, लिंगया प्रशांत गौड व नरसिमल्लू पूठ्ठा (सर्व रा. आंध्र प्रदेश, हल्ली मुक्काम नेवासा फाटा) हे देशी दारूच्या  सीलबंद बाटल्यांमधून काही प्रमाणात दारू काढून ती दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरत होते.

दारू काढलेल्या बाटल्यामध्ये पाणी भरून पुन्हा चिकट टेप लावून पहिल्यासारखेच सील करत होते. या दुकानातून पथकाने ३०० पत्री बनावट बुच, संत्रा, बॉबी या ब्रँडचे बनावट दारू तसेच चिकट टेप, भेसळयुक्त देशी दारूच्या ३ हजार ५५५ सीलबंद बाटल्या, काचेच्या 36 बाटल्या, पाण्याचे जार आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

घोडेगाव येथील बी. एम. कलाल या देशी दारू दुकानातही पथकाला असाच प्रकार आढळून आला. या ठिकाणी ४१२८ रिकाम्या बाटल्या, ८६ बॉक्स, ७७५ बनावट बुचे, प्लास्टिक बकेट आदी मुद्देमाल आढळला. नेवासा येथील दारू दुकानातही छापा टाकून काही संशयितांना अटक केली आहे.

सलाबतपूर येथील देशी दारूच्या दुकानात छापा टाकला तेव्हा तेथेही असाच प्रकार सुरू होता. दुकानाशेजारीच असलेल्या एका खोलीत प्रशांत राधेशाम गौड हा  बाटल्यांमध्ये पाणी भरून भेसळयुक्त दारू तयार करत होते. याठिकाणी  पथकाने ३०० बुच व ३०० रिकाम्या बाटल्या,१ लोखंडी बादली तसेच ९ बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य आढळले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एन. बी. शेंडे, बी. टी. घोरतळे, निरीक्षक राख, हुलगे, अनिल पाटील, अण्णासाहेब बनकर, संजय कोल्हे,  आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !