अहमदनगर - शनिवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड अतिदक्षता विभागाला आग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा नोंदवला जाणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे पोलिसांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.
अतिदक्षता विभागाला आग लागण्याचे नेमके कारण काय, त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होण्यासाठी कोणाचा हलगर्जीपणा कारणीभूत होता, हे समोर येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा प्रशाकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ नजिकच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवणे गरजेचे होते. परंतु, तशी फिर्याद न आल्यामुळे अखेर सहायक पोलिस निरीक्षक मुजावर यांनीच याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.
जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी संवेदनशीलता व तत्परता दर्शवत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सध्या तरी 'अज्ञात' व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सोपवलेला आहे.
आता पोलिसच या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. रुग्णालयात आग लागण्याचे नेमके कारण काय, त्यासाठी कोण कारणीभूत होते? रुग्णांचे जीव वाचवणे अपेक्षित असताना त्यात हलगर्जीपणा कोणी केला, या सर्व अज्ञातांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलेला आहे. याचा तपास झाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे तपासी अधिकारी गडकरी म्हणाल्या.