मुंबई - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. या दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माहिती घेतली आहे.
या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे, तसेच हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी संवाद साधला. सध्या उपाचार घेत असलेल्या रूग्णांना इतरत्र उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी पाहण्यास सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे.