अहमदनगर - कोविड काळात शासनाला सहकार्य करत जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारे आरोग्य कार्यक्रम पार पाडले आहेत. परंतु, आता काही मागण्यांसाठी त्यांचीही सहनशीलता संपत चालली आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर डिसले यांनी दिली आहे.
कोविड- १९ संसर्गजन्य साथरोग प्रतिबंधक कार्यक्रम सर्व आरोग्य कर्मचारी पुरुष व स्त्री यांनी उत्तमप्रकारे पार पाडले. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमही पार पाडले आहे. तसेच इथून पुढेही सर्व आरोग्य कार्यक्रम सुरळीत चालू राहतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विद्यमान समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ चे अनेक पत्र दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. जवळपास सर्व संवर्ग यांचे १०, २०, ३०, वर्षानंतर सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला. परंतु आरोग्य कर्मचारी आजून यापासून वंचित आहेत.
अनेक जिल्हा परिषदांनी आरोग्य सहाय्यक पदावर आरोग्य सेवक यांना पदोन्नती दिली. तसेच आरोग्य सहायिका पदावर आरोग्य सेविका यांना पदोन्नती दिली आहे. परंतु नगर जिल्हा परिषदेकडून हे झाले नाही. हि बाब नक्कीच विचार करण्यासारखी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न ३० नोव्हेंबर २१ पर्यंत मार्गी लावावा, अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा १ डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेत साखळी पद्धतीने उपोषणाला बसणार आहेत.