अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. त्यामध्ये आग लागली त्यावेळी नेमके काय घडले हे पोलिसांनी तपासले आहे. यातून कोविड कक्षात दिसत असलेला अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोविड कक्षामध्ये लागलेल्या आगीमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला होता. तसेच सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आग लागली त्यावेळी कोविड कक्षामध्ये एकही डॉक्टर उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ काही नर्सेस तेथे होत्या. आग लागली त्यावेळी त्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. जर डॉक्टर तेथे असते तर त्यांनी काही रुग्णांचे प्राण वाचवले असते.
मात्र, या कक्षामध्ये आग पसरत गेली त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते किंवा आग प्रतिबंधक यंत्रणाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. तसेच कोविड कक्षाचे सर्व दरवाजे बाहेरच्या बाजूने कुलुपबंद होते. त्यामुळे रुग्णांना बाहेर पडता आले नाही. अन् धुरामुळे काहीच दिसेनासे झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब समोर आल्यामुळे पोलिसांचा तपास आता सुस्पष्ट झाला आहे. तसेच याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही माहिती घेतली आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणी मोठा निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केलेले आहे.