नेवासा - सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांची शुक्रवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्याकडे सोनई पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार सोपवला आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. सहायक निरीक्षक कर्पे यांनी दीड वर्षांपूर्वी सोनईत नियुक्ती केली होती. मात्र कर्पे यांच्या कार्यपध्दतीविषयी अनेकांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
शनिशिंगणापुर येथील भक्तांना त्रास देणाऱ्या लटकूंचा बंदोबस्त करण्यात कर्पे अपयशी ठरले. वाळू तस्करी, चंदनचोरी, मटका, जुगार या वाढत्या अवैध धंद्यांसह, वाढत्या चोर्या रोखण्यात त्यांना अपयश आले होते.
या पोलिस ठाण्यात तडजोडी करुन गुन्हे दाखल केले जातात, अशा तक्रारीही पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या होत्या. एक विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात उपोषण केले होते.
घोडेगाव येथील ग्रामदैवत घोडेश्वरी देवी मंदिरातील दागिण्यांचा तपास देखील त्यांना लावता आला नाही. मंत्री शंकरराव गडाख यांच्या गावातील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाल्यामुळे या बदलीची उलटसुलट चर्चा होत आहे.