अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या अग्निकांडामध्ये ११ जण दगावले होते. या घटनेच्या वेळी निष्काळजीपणा दाखवलेल्या ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
अहमदनगर शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथी व आयुर्वेद डॉक्टर संघटनांनी या अटकेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती.
या अटकेच्या निषेधार्थ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज चोवीस तास ओपीडी बंद ठेवण्याचा, तसेच शस्त्रक्रिया देखील न करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईला निषेध व्यक्त केला जाणार आहे.
गुरुवारी बंद घोषित केला असून फक्त तातडीची वैद्यकीय सेवा सुरू राहील, असे इंडियन मेडिकल असोसिएशन, अहमदनगर शाखेने स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर हे आंदोलन राज्यभर तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अग्निकांडाच्या चौकशीसाठी राज्य शासनाने समिती नियुक्त केली आहे. या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी व नर्सेस यांना अटक करणे चुकीचे आहे, त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. पारस कोठारी, डॉ. जयदीप देशमुख, तसेच कर्मचारी उपस्थित होते.