पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये काही नर्सेसचा समावेश असल्याने जिल्हा रुग्णालयातील नर्सेस आणि शहरातील डॉक्टरांच्या संघटना चिडल्या आहेत. ही अटक चुकीची असल्याचे म्हणत त्यांनी गेले तीन दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तणावाचे झाले आहे.
दरम्यान पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातून जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आग लागल्यानंतर सुरुवातीची १५ मिनिटे अतिदक्षता विभागात कोविड रुग्ण वगळता कोणीच डॉक्टर कर्म्रचारी नव्हते. पंधरा मिनिटांनी बाहेरच्या लोकांनी आत जाऊन बचावकार्य केले.
तब्बल २५ मिनिटांनी त्या कक्षामध्ये नियुक्ती केलेल्या डॉक्टर आणि नर्सेस तेथे आल्या. त्यांनी रुग्णांना वाचवण्यासाठी काहीच केले नाही, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. या पुराव्यांमुळेच अटकेची कारवाई केल्याचे तेे म्हणाले.
ज्यावेळी अतिदक्षता विभागाला आग लागली होती. त्यानंतर बाहेरचे लोकांनी आत जाऊन बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्यांची कक्षामध्ये नियुक्ती केलेली होती, ते बाहेर येऊन चहापाणी करत होते, इतरत्र फिरत होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.