अहमदनगर - जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत ११ जणांचा म़ृत्यू झाल्यानंतर मंत्री आणि राजकीय नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. दुपारी आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नेत्यांचा ओघ सुरूच होता.
महाविकास आघाडीतील मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही सायंकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयाला भेट दिली. त्यांनी अतिदक्षता विभागाची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या घटनेची सखोल चौेकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
हेदेखील वाचा - जिल्हा रुग्णालयात 'आयसीयु' विभागाला भीषण आग, ११ जण दगावले
आघाडी सरकारच्या आरोग्य राज्यमंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीही जिल्हा रूग्णालयात भेट देत पाहणी केली. तसेच पत्रकारांशी संवाद साधत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगरचे अग्नीतांडव ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' आदेश
नीलम गोऱ्हे यांचाही दौरा - शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील नगर दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा रुग्णालयात झालेल्या जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक यांची बैठक त्या घेणार आहेत. नंतर त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.