अहमदनगर - जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडिटसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हा रुग्णालयास आग लागलेल्या अतिदक्षता विभागास मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, दुर्घटना शॉट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ८ दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नातेवाईकांना मदत कधी ?
मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपये व राज्य आपत्ती निधीमधून २ लाख रुपये अशी ७ लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. या मदतीपोटी आज ११ जणांपैकी मृत्यू झालेल्या एका रुग्णांच्या नातेवाईकास प्रातिनिधिक स्वरूपात २ लाख रुपयांचा धनादेश वितरित केेला. उर्वरित रुग्णांच्या नातेवाईकांना दोन दिवसाच्या आत मदतीचा धनादेश देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.