अहमदनगर - जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत ११ रुग्ण दगावले होते. याप्रकरणी पोलिसांनीच स्वत:हून तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास आधी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलेला होता.
या घटनेबद्दल सहायक पोलिस निरीक्षक मुजावर यांनी शनिवारी सायंकाळी फिर्याद दिली होती. त्याचा तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे सोपवलेला होता. मात्र, या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती मोठी असल्याचे समाेर येत आहे. त्यामुळे तपासी अधिकारी बदलण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवला आहे. मिटके हे यापूर्वी नगर शहर पोलिस उपअधीक्षक हाेते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक म्हणून झाली. मात्र नगरच्या शहर पोलिस उपअधीक्षकांची बदली झाली.
त्यामुळे नगर शहराचे पोलिस उपअधीक्षकपद रिक्त झाले. या पदाचा अतिरिक्त कार्यभार मिटके यांच्याकडे दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांड प्रकरणाचा तपास आता मिटके यांच्याकडे सोपवला आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केलेला आहे.