अहमदनगर - शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर योद्ध्यांचा अंतिम प्रवास वेदनारहित व आनंदी करण्यासाठी 'आरंभ पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर सेंटर'च्या वतीने कर्करोगाने आजारी असलेल्या पालकांच्या मुलांना प्रसिद्ध सिनेअभिनेते आरोह वेलणकर यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
तीन मुली व दोन मुले यांना कौशल्य विकासासाठी बालदिनाचे औचित्य साधत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी किर्ती उद्योग समूहाचे डॉ. अविनाश मोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
शिवाजी जाधव, मराठा लाईट इन्फंट्रीचे हवालदार आदिनाथ साबळे, आरंभच्या कार्यकर्त्या आणि कॅन्सर योद्धा ज्योती साबळे, शिल्पा देवडे, दीपाली पुराणिक, शर्मिला कदम, वज्रेश्वरी नोमुल, सुमन गवारी उपस्थित होते.
आरोह वेलणकर यांनी आरंभचे काम सिनेसृष्टीपर्यंत नेण्याचे आश्वासन दिले. कर्करोग बरा होण्यासाठी जनजागृती अधिकाधिक व्हावी, असे मत त्यांनी यावेळी दिले. डॉ. अविनाश मोरे यांनी आरंभच्या कार्यासाठी सहयोग देऊन नवीन पिढीला धुरा सांभाळण्याचे आवाहन केले.
स्वामी ट्रान्सपोर्ट व गॅस एजन्सीचे संजय पाटील यांनीही आरंभ संस्थेला मदत केली व त्यांच्या शुभेच्छा दिल्या. तान्या मुलतानी, पल्लवी साबळे, भार्गवी पुराणिक या तीन मुलींना व रमेश शिरतार आणि पुनीत शेंदुरकर या दोन मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
शिष्यवृत्तीसाठी पुणे येथील सुहासिनी बिवलकर यांनी सहयोग दिला. यावेळी गणेश राजेभोसले, अजय पवार, भरत कुलकर्णी, शंतनू खानवेलकर, जितेंद्र देवकर, माय टिफिनचे संचालक हेमंत लोहगावकर, केडगाव येथील ज्येष्ठ नागरिक लगड तसेच आयटीआयचे माजी प्राचार्य अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रदीप काकडे ह्यांनी केले. तर अध्यक्ष चांदभाई शेख यांनी यावेळी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.