मुखवटा चढवून जगाच्या बाजारात उभं रहायचं....

कित्ती छोट्या छोट्या गोष्टींसाठी माणसं एकमेकांपासून दूर जातात. निरभ्र आकाशात पांढरे.. निळसर झाक असलेले, एकमेकांना बिलगून असलेले ढग एका वाऱ्याच्या झोताने दूर विखरुन जातात. तशी नाती गैरसमजाच्या वाऱ्याने विखरावी इतकी तकलादू असावीत का ? 


याआधी ते ढगांचा एकमेकांना बिलगणं खरं होतं ? का तो फक्त आभास होता ? आपण आभासालाच आपलं मानून चालतं होतो का ? ह्या प्रश्नांची उत्तर काळावर सोडून द्यावीत.. तशी माणसंही दूर जातात. आपण केलेलं प्रेम, त्याग, माया क्षणात विसरतात.

अर्थात आपण त्याग, माया करताना पूर्णपणे आपलं सत्व, आयुष्य पणाला लावलेलं असतं. पण समोरच्याला ते क्षुल्लक वाटतं. आपण तुटतो. एका क्षणी मन विचारतं, याचसाठी केला होता का अट्टाहास ?

केवळ आपण हक्काने एखादा शब्द बोलला म्हणून.. आपल्याला माणसं वापरुन घेतायतं हे समजायला खरच वेळच लागतो. जेव्हा समजतं तेव्हा आपण तुटायचं नसतं आतून.. आपलं चांगुलपण अबाधित रहावं म्हणूनच मन घट्ट करत रहायचं. तुटलेल्या हृदयाचे तुकडे जोडतं नव्या दिवसाला सामोरं जायचं. 

मनाचं ठिगळ जमान्याला दिसू नये म्हणून हसरा मुखवटा चढवून जगाच्या बाजारात उभं रहायचं.. आपण नेहमीच प्रेझेंटेबल असलं तर जगाच्या बाजारात आपल्याला किंमत राहते. नाहीतर तुमच्या हळव्या मनाला काडीचीही किंमत नसते. अशावेळी आपल्याला आपली गेलेली माणसं आठवतं रहातात. मन व्याकूळ होत रहातं.

काही माणसं आपल्या आयुष्यात आधारस्तंभ असतात. काही वडाच्या झाडासारखी... त्यांनी दिलेल्या मायेच्या सावलीवर त्यांच्या वियोगात आपण सारं आयुष्य जगू शकतो. कुठे जातात ही माणसं ? काळाच्या पडद्याआड की जमीनीखाली खोल मातीत राख होऊन ?

आपण त्यांच्या आठवणींने व्याकूळ होतो.. कातरवेळी उदास डोळे वाहतात. हे त्यांना कळत नसावं का ? पण आपण तुटायचं नाही, या शपथेवर आनंदाचा सामंजस्याचा मुखवटा तोंडावर घालून रोजच्या दिवसाला सामोरं जायचं असतं.

आपल्या तुटलेल्या स्वप्नांना मातीत गाडून ताठ उभ रहायचं असतं. कारण बाजारात प्रेम विकत मिळत नसतं. आपल्या वेदनेची जाणीव समोरच्याला नसणं, हेच काळीज पिळवटून टाकणार असतं. हे जितक्या लवकर ज्याला कळेल खरतर तोच शहाणा. होय ना !

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !