मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि अहमदनगरमध्ये दुपारपासूनच धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली.
उत्तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही भागात तीव्र पावसाचे ढग दिसत आहेत. पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ढगांच्या गडगडाटासहीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
अहमदनगर शहरात शनिवारी दुपारी धुव्वाधार पाऊस झाला. दुुपारी तीन वाजेच्या सुमारास सावेडी परिसरात पावसाला सुरूवात झाली. तर शहरात अडीच ते पावणेतीन वाजेेला पाऊस सुरू झाला. हा पाऊस इतका मुसळधार होता की काही मिनिटांतच शहरातील रस्ते जलमय झाले.
पटवर्धन चौक परिसर, चितळे रोड, कापड बाजार, चौपाटी कारंजा ते दिल्ली गेट रोड, अमरधाम समोरील रोड, आयुर्वेद कॉलेजमागील परिसरात रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले. चारचाकी गाड्या अक्षरश: पाण्यात तरंगत होत्या. मनमाड रोड तसेच सावेडी परिसरात वादळामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला. कापड बाजार व चितळे रोड परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले. दुचाकी वाहने तर पाण्याच्या वेगामुळे दूरपर्यंत वहात गेली. अचानक आलेल्या पावसामुळे नगरकरांची चांगली त्रेधातिरपिट उडाली. अनेकांचे नुकसान झाले.