इतिहासातील समृद्ध स्मृतींची उजळणी करून देणाऱ्या अनेक सुरेख वास्तू आपल्या जिल्ह्यात आहेत. त्यांचे योग्य जतन केले. सभोवतालचा परिसर सुशोभित करून स्वच्छता, साजेशी प्रकाशव्यवस्था निर्माण करून वास्तूच्या माहितीचा फलक उभा केला. तर त्या भागाच्या सौंदर्यात भर पडेल.
पर्यटक याकडे आकर्षित होऊन त्यांना या भागाला भेट देताना नक्कीच आनंद वाटेल. आपल्या देशात इतर अनेक राज्यात अशा वास्तूंचे योग्य ते जतन केले आहे. परदेशात तर इतिहासाला उजाळा देणाऱ्या अशा वास्तू त्या देशाचा गौरव समजल्या जातात. तो त्यांचा अमूल्य ठेवा असतो.
तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी खास सुविधा पुरविल्या जातात. म्हणूनच "हेरिटेज" या शब्दात वेगळीच गरिमा आहे. त्या त्या देशाचा, राज्याचा इतिहास ही तुमची ओळख असते. मागोवा असतो. त्याचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असते.
काल विजयादशमी निमित्त मी आणि माझा मित्र प्रशांत देशपांडे मोहटा देवी दर्शनाला पाथर्डीला गेलो होतो. वाटेत रस्त्यावर असणाऱ्या तिसगाव येथील वेस नजरेस पडली. तिसगाव हे ऐतिहासिक शहर. एकेकाळी गावाभोवती असलेल्या वेशीसाठी प्रसिद्ध...
या गावात निजामशाहीत गावाभोवती तटबंदी म्हणून वेशी बांधल्या होत्या. काळाच्या ओघात त्यातील अनेक संपुष्टात आल्या तर उरलेल्या पडक्या अवस्थेत दिवस कंठीत आहेत. त्यातीलच अहमदनगर रस्त्यावरील ही वेस अजूनही शाबूत आहे.
वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ही वेस म्हणजे तिसगावची ऐतिहासिक ओळख म्हणायला हवी. या सुंदर वास्तूच्या भोवतालच्या परिसराचे जतन करून सुशोभीकरण झाले. वेशीवर प्रकाश व्यवस्थेची सोय केली तर या गावच्या सौंदर्यात नक्कीच भर पडून हा परिसर खुलून जाईल.
परंतु आज या वेशीची अवस्था पाहून मन खिन्न झाले. वेशीवर उगवलेली झाडे वेशीची कर्मकहानी दर्शवत होती. इतिहासाप्रती आपल्याला किती आस्था आहे.? याचेच हे दर्शन म्हणावे लागेल. हे असेच चालू राहिले तर काहीच वर्षात ही वास्तू देखील काळाच्या ओघात नष्ट होईल.
अन् दुर्दैवाने एका समृध्द इतिहासाची खूण पुसली जाईल.. याच रस्त्यावरून मोहटा देवी, कानिफनाथांची समाधी असलेले मढी, वृद्धेश्र्वर येथे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येत असतात. त्यांनाही वाटेत ही वेस लागते. निदान त्याचे जतन करून सुशोभिकरण झाले तर या गावचा इतिहास जाणून घ्यायला त्यांना निश्चित आवडेल.
गावची महती सर्वदूर जाईल. दुर्दैवाने संबंधीत पुरातत्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांना सरकारचा पगार घेण्या व्यतिरिक्त या गोष्टीची कोणती आत्मीयता, कर्तव्यांची जाणीव नसावी. किंवा त्यांच्यापुढे कोणत्या अडचणी आहेत हे ही कळत नाही.
आम्हा नगरकरांची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, देशाच्या इतिहासात समृध्द म्हणून गणला गेलेल्या नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावर धोकादायक रित्या वाढलेली मोठं मोठी झाडे पाहून कोणाला याचं साधं दुःख देखील होत नाही.
एक दिवस हा किल्लाच ढासळण्याची भीती असताना आम्हाला याचे काही वाटतं नसेल तर या वेशीचे काय घेऊन बसलात..? प्रशांत आणि मी कितीतरी वेळ या वेशी जवळ उभे होतो. खिन्न मनाने वेशीची अवस्था पहात दुःखी होत कार मधे येऊन बसलो.
इतिहासाची जपणूक केली.. इथल्या वास्तूंची गरिमा ओळखत त्याचं महत्व आपण जाणलं तरी हा इतिहास तुमचं भविष्य उंचीवर नेऊन ठेवेल.. एकेकाळी तीस वेशींमुळे प्रसिद्ध असलेलं तिसगाव..!
चांगल्या अवस्थेतील तिसगावची ही वेस निदान जपायला हवी.. सन्माननीय राज्यकर्ते, संबंधीत विभाग नक्कीच याकडे गांभीर्याने लक्ष देतील, असा विश्र्वास वाटतो..
- जयंत येलुलकर,
(रसिक ग्रुप, अहमदनगर)