अहमदनगर - संघ लोकसेवा आयोगाद्वारे ( यु.पी.एस.सी.) मागील वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातील विनायक नरवडे ( रँक ३७), सुहास गाडे ( रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), राकेश अकोलकर (रँक ४३२), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) यांनी उत्तुंग यश संपादन केले.
महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून येत्या शनिवार दि. २ ऑक्टोबर रोजी या सर्व यशस्वित्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्णसंधी युवानच्या ‘प्रेरणा’ उपक्रमामार्फत नगरकर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. युवानच्या प्रेरणा उपक्रमाचे हे १० वे पर्व आहे. बदलाची सुरवात स्वतःपासून करा, या गांधींच्या विचारांपासून प्रेरणा घेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ गांधीवादी समाजसेवक पदमभूषण डॉ.एस. एन. सुब्बराव, ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारणारे पदमश्री पोपटराव पवार यांज हस्ते या नवोदित अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या वतीने गौरवले जाणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४. ३० वाजता नगर शहरातील झोपडी कँटिन जवळील माऊली सभागृह येथे हा मोफत ‘प्रेरणा’ कार्यक्रम होणार आहे.
या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘युवान’ मार्फत करण्यात आले आहे. उपस्थितांना मास्क आणि कोविड सुसंगत वर्तन अनिवार्य आहे. उपस्थितीच्या मर्यादेमुळे युवान इंडिया (YuvaanIndia) ह्या यु-ट्युब आणि फेसबुक चॅनलद्वारे हा कार्यक्रम लाइव्हही पाहता येणार आहे, अशी माहिती युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी दिली आहे.