मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
त्यानुसार मंगळवारी तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला होता. तो होणार की मागे घेणार, याबाबत अद्यापही एसटी कामगार संघटनांचे धोरण स्पष्ट झालेले नाही.
कोरोना संकट काळात एस.टी.कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
एसटी महामंडळाचे थकित वेतन आणि राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास २७ ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.