शेवगाव - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन मागे घेतल्याचे समजले. कर्मचाऱ्यांना काही मागण्याच पूर्ण झाल्या. त्यामुळे शेवगाव आगारातील बसचालक दिलीप काकडे हे अस्वस्थ होते. त्यांची एक इच्छा हाेती. ती पूर्ण होईल की नाही, असे वाटत असतानाच त्यांच्या आत्महत्येची वार्ता समोर आली.
शेवगाव आगाराचे चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६) यांनी एसटीच्या मागील बाजूच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शेवगाव तालुक्यात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काकडे यांची एक इच्छा त्यांच्या सहकाऱ्यांनी व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितली आहे.
एसटी कर्मचारी अहोरात्र राबतात. त्यांच्यासाठी शासन, महामंडळ, पुढारी, कुणीही काही करत नाही. आम्हाला शासकीय सेवेत घ्या, कामगार कसे जगतात, त्यांची मानसिकता बघा, तात्पुरत्या आश्वासनांवर समाधान मानू नका, कायमस्वरुपी उपाय शोधा, ही खंत काकडे कायम व्यक्त करायचे.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काकडे यांच्या आत्महत्येनंतर गावासह तालुक्यातवर शोककळा पसरली. त्यांचे सहकारीही त्यांच्या आत्महत्येच्या वार्तेमुळे हवालदिल झाले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्ववन केले.
आपण सेवानिवृृत्त होऊ त्या दिवशी एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन झालेले असावे, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते आग्रही होते. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेऊ नका, असे ते म्हणायचे, अशी खंत एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी लबडे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - आंदोलन पेटले | शेवगाव आगारात एसटीचालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी उचलले टोकाचे पाऊल