अहमदनगर - जिल्ह्यातील पहिली शंभर टक्के डिजिटल अभ्यासकम असलेली शाळा असल्याचा मान राहाता तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला मिळाला आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य राजेश ( आबा ) परजणे पाटील यांच्या संकल्पनेतून हा मान मिळाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पहिली १००% डिजीटल अभ्यासक्रम असणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर येथे आहे. होम रिवाईज या ऑफलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रविवार शिष्यवृत्ती जादा तासिका घेतल्या जातात. इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी प्रोजेक्टर स्क्रीनवर ही तासिका घेण्यात आली.
या सॉफ्टवेअरमध्ये मुलांसाठी सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच इयत्ता निहाय कोणते घटक घेण्यात आले, याचे संपूर्ण रेकॉर्ड स्वतंत्रपणे तयार होते. मुलांसाठी सर्व घटक हे अनिमेशन पद्धतीने तयार केलेले असल्याने मुलांनाही सर्व घटक मनोरंजनात्मक रित्या समजतात. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच जि. प. सदस्य राजेश परजणे यांचेही अभिनंदन होत आहे.
झेडपी सदस्य राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून या शाळेत उत्कृष्ट मनमोहक असे उद्यानही साकारले आहे. विविध प्रकारच्या फुलांच्या व रोपांच्या प्रजाती या उद्यानात आहेत. लहानपणीच मुलांना पर्यावरणाची गोेडी लागावी, त्यांना फुलांची माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवला आहे. याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.