तुला हिणवण्यात सारं आयुष्य गेलं..
कधी तुझे लाड केले नाही, तुझं कौतुकही नाही..
तरीही तुला याच कधी दुःख झालं नाही..
तुझी चपळता, तुझा आवेश..
तुझ्या आवाजातील मर्दानगी,
आम्हाला कधी जाणवलीही नाही..
तुझा स्पर्शही नकोसा..
क्षणभर खिडकीबाहेर आलास की,
शुक शुक करीत आम्हीं तुला
तिथून घालवण्यात समाधान मानलं नेहमी..
तू काळा.
त्यावर कधी गुलाबी रंग सांडावासा वाटला नाही आम्हाला..
तू नेहमीचं अस्पृश्यांच्या यादीत...!
पण कधी तू दुखावला नाहीस.. कधी हिरमुसला देखील नाहीस..
की रडवेला झाला नाही...
काव काव करीत तू यावं ..
भरलेल्या चोचीने शांत बसावं..
फांदीवर..
तू मेहनती, तू धैर्य. तू दिव्य ..
तुझा राग राग केला..
पण तू कधी निराश नाहीस..
कधी एकटा, कधी तूझ्या गदारोळात..
तुझी तीक्ष्ण नजर..
आकाशाचा वेध घेणारी..
तर कधी मातीतले हिरवे अंकुर डोळ्यांत साचवणारी...
माणसाच्या आयुष्यातील विरहाच्या, दुःखाच्या क्षणी तूही
गलबलून जावं..
रस्त्यावरून चाललेल्या शोकाकुल जमावाचा तू भाग होऊन जातोस..
झाडाच्या फांदीवरून तूझ्या डोळ्यांतून टपकलेले थेंब..
दिसलेच नाही कधी आम्हाला..
पण तू हे जाणवू ही दिलं नाहीस...
तुला कळणारा,
आमच्या मनातला तुझा तिरस्कार...
खरंच,तुझी दखलही कधी घ्यावी वाटली नाही मित्रा..
पक्षांवर जीव लावणारे आम्हीं...
खिडकीत आले की त्यांना आनंदाने दाणे भरवत कृतकृत्य होणारे आम्हीं..
पण,
तु दारात डोकावलास तरी,
काहीतरी विपरीत घडेल असं वाटून
अख्खा दिवस तोंड घेऊन बसणारे आम्ही लोकं...
तू म्हणजे पणवती...
हेच समजलो आजवर..
माणसाचा आयुष्याचा अखेरचा प्रवास...
माणूस किती मोठा असो की छोटा...
उच्च असो की नीच...
तेव्हा आकाशाकडे, झाडांत, पानांत, इकडे, तिकडे
तुला शोधत, तुझी वाट पाहत,
तू यावं,
म्हणून विनवणी, प्रार्थना करत..
केविलवाणे होऊन जातो सारे ...
तेव्हा, सगळ्यांना दिसत असतो तुझ्यात,
त्यांचा हरवलेला प्रेमाचा माणूस...
- जयंत येलुलकर, रसिक ग्रुप, (अहमदनगर)