औरंगाबाद - राज्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात मोठा वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचे गूढ उकलले आहे. दि. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांच्या खुनाची बातमी समोर आली होती. त्यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. अल्पवयीन असल्याने त्याचे नाव पोलिसांनी सांगितले नाही.
उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा असे आधी वाटले होते. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेलेली नव्हती. किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना काही झालेले नव्हते.
शिंदे यांना चाकूने भोसकले नव्हते. तर त्यांचा गळा चिरला होता. दोन्ही हातांच्या नसा कापल्या होत्या, हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे, या दिशेने चर्चा आणि पोलिसांचा तपास सुरू झाला होता.
प्रा. शिंदे हे उमदे व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक होत्या. त्यामुळे घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारले होते. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हते. शिंदेंशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. घटनास्थळी ठोस पुरावे नव्हते. रात्री बारानंतर घरात कोण आले आणि बाहेर पडले असेही दिसत नव्हते.
मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती नव्हती. पण मारेकरी कोण हे मात्र पोलिसांच्या लक्षात आले होते. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले.
निकटवर्तीय अल्पवयीन मुलाने हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहिरीत टाकल्याची कबुली दिली. शिंदेंना का मारले याचे 'कारण'ही सांगितले. मात्र हे कारण पोलिसांनी अद्याप माध्यमाकडे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अजूनही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.