औरंगाबाद - प्रा. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१, रा. संत तुकोबानगर, एन-२, सिडको) यांचा रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरात गळा, दोन्ही हातांच्या नसा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला. मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजीचे विभागप्रमुख होते.
अज्ञात मारेकऱ्याने प्रा. शिंदे यांचे कान कापून त्यांच्या डोक्यात हातोड्याने वार केले. या खुनाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिंदेंच्या पत्नी, मुलगा, मुलीची साडेचार तास कसून चौकशी केली.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. परंतु संशयाची सुई शिंदे कुटुंबीयांभोवतीच फिरत आहे.
डॉ. शिंदे यांच्या पत्नी मनीषा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानाबाद उपकेंद्रात प्राध्यापक आहेत. त्यांना चैताली, रोहित ही मुले आहेत. रोहित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे.
डॉ. शिंदे यांनी २००९मध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव म्हणून काम सुरू केले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी 'आन-बान-शान' आणि अडीच वर्षांपूर्वी 'उधमसिंग ब्रिगेड' संघटना स्थापन केली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात ते बहुचर्चित होते.
तर चैताली एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मनीषा ८ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेतून औरंगाबादेत आल्या होत्या. विद्यापीठात अधिसभा बैठकीला त्या उपस्थित राहिल्या.
रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी त्यांची छावणीतील एका कॉलेजमध्ये नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांनी सोमवारची सुटी घेऊन मंगळवारी उस्मानाबादला जाण्याचे ठरवले होते.