मुंबई - कोरोनामुळे गेली अडीच वर्षे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यापैकी दोन आठवड्यांपूर्वी इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर तीन दिवसांपूर्वी ज्युनिअर कॉलेजस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांबाबत महत्वाची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.
आता प्राथमिक शाळाही लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरू करण्यावर जोर असल्याचे दिसत आहे.
राज्यात लवकरच सरसकट शाळा सुरु होणार आहेत, असे सुतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. राज्यात लवकरच पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला.