नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला. त्यानंतर परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. त्यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच परमबीर सिंग परदेशात असल्याची माहिती समोर येत आहे.
परमबीर सिंह यांना शोधण्यास पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये गेले असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपय चांगलेच संतापले आहेत. त्यांनी परमबीर सिंग हे बेल्जिअममध्ये कसे काय गेले, असा सवाल उपस्थित केला आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे. 'माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंत्र्यावर हप्ता वसुलीचा आरोप केला होता. मात्र ते स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहे. पोलिस म्हणत आहेत की ते फरार आहेत. आता सिंह बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु, परमबीर सिंग यांना तिथपर्यंत कोणी पोहोचवले. याचे उत्तर कोणाकडेही नाही. तसेच त्यांना आपण भारतात परत आणू शकत नाही का? असा सवाल निरूपम यांन विचारला आहे.