अहमदनगर - कोवीड (Covid19) काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम शेती क्षेत्राने केले आहे. तेव्हा शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governer) (Bhagat Singh Koshiyari) यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा (Mahatma Fule Agriculture University Rahuri) पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ आज रोजी पार पडला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रिये रस्ते, वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), खासदार शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादाजी भुसे (Dada Bhuse), उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते.
यावेळी खासदार शरद पवार आणि नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची वाटचाल विकासाकडे होईल.
कृषी विद्यापीठांनी आपल्या मराठी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.असेही कोश्यारी यांनी सांगितले.
पदवी प्रदान झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के महिला होत्या. सेंद्रीय शेती, प्रक्रीया उद्योग व विपणन यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहेत. फळबाग लागवडीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. यात कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे.
राठौड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला जाणार आहे. कृषी शिक्षणात माहिती- तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अंगीकार करत विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनावर भर दिला पाहिजे.
पदवीदान समारंभात २ वर्षातील विविध विद्याशाखांतील ११ हजार ४६८ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित केले. त्यात विविध विद्याशाखातील १० हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर १०४ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले.