नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी पूजनाचा. देवी हातात जपमाला आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान करते. देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फूल अर्पण करावं, कारण हे देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फूल आहे.
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते.
देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थदेखील आहे.
“आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे, आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे” या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.
जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल, तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय. आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.
जो आपला मूळ स्वभाव आहे. आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.
शब्दांकन - दिपाली विजय माळी (अ.नगर)