अहमदनगर - युवान संस्था आणि भारतातील युवकांचे प्रेरणास्थान ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक पद्मभूषण डॉ. एस. एन. सुब्बराव यांचे जयपूर येथे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी युवान संस्थेच्या वतीने सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा शनिवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे होणार आहे. डॉ. सुब्बराव जनसामान्यांमध्ये भाईजी या नावाने परिचित होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात सेवादलात विशेष दुभाषी म्हणून त्यांनी १३ वर्षे काम पाहिले.
चंबळ खोर्यातील सहाशेपेक्षा अधिक हिंसक डाकूंच्या आत्मसमर्पणात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांनी तेथे महात्मा गांधी सेवा आश्रमची स्थापना केली. युवानमार्फत २ ऑक्टोबरला आयोजित प्रेरणा कार्यक्रम हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. नगरशी त्यांचे विशेष नाते होते.
सन २०११ व २०१५ साली नगरला राष्ट्रीय एकात्मता युवा शिबिराच्या संयोजनाची संधी त्यांनी संदीप कुसळकर यांना दिली. २००५ सालीही आंतरभारती राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचेही त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते युवा कार्यासाठी वाहिलेल्या युवान संस्थेची स्थापना झाली.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत १९७२ साली सुब्बराव यांनी हा ऐतिहासिक आत्मसमर्पण घडवून आणले होते. त्यासाठी त्यांना इंदिरा गांधींच्या मरणोत्तर आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना १८ भारतीय भाषा अवगत होत्या.
अमोघ वाणी आणि गायनाच्या जोरावर त्यांनी लाखो समाजसेवी तयार केले. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभिनयानात ते प्रमुख सहयोगी होते. ते गुरुकुंज आश्रम मोझरीचे (जि. अमरावती) संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य भजनाच्या माध्यमातून पुढे आणण्यात त्यांचा वाटा होता.
राष्ट्रीय एकात्मता, श्रमदान, गांधी विचारांवर आधारित हजारांवर युवा शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. लाखो युवकांना रचनात्मक कार्याची प्रेरणा दिली. यात श्री. श्री. रविशंकर, जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, डॉ.पी. अन्बलगन आदी मान्यवरांचा समावेश होता.