अहमदनगर - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात मोठी गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात महिलांचे दागिने बळजबरीने हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. पण आता पोलिस दलाने एक उपाय शोधला आहे.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात होणारी गर्दी विचारात घेता अहमदनगर शहर पोलिस दलाच्या वतीने कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार संग्राम जगताप, पोलिस निरीक्षक, व्यापारी वृंद माेठ्या संख्येने उपस्थित होते.
कापड बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची सुरक्षा करण्यासाठी पोलिस दल कसोशीने प्राधान्य देणार आहे. त्यामुळे कापड बाजारात अतिरिक्त महिला पोलिसांचा बंदोबस्त दिला जाणार आहे, अशी ग्वाही शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे.
मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे. आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडाली आहे. कोरोनाचे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या बैठकीत व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढ नये, यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.