मुंबई - निवासी डॉक्टरांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. त्यानुसार कोविड काळात काम केलेल्या निवासी डॉक्टरांना प्रत्येकी घसघशीत रक्कम मिळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेतली होती. त्यावेळीही या विषयावर चर्चा झाली होती. त्यामध्येही मुख्यमंत्र्यांनी मागणी पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. आणि लगेचच याबाबत शासन निर्णय काढला गेला.
शासन निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील.
हा शासन निर्णय तातडीने काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या मागणीसाठी मार्डच्या वतीने वारंवार राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना वेळोवेळी दिलेले होते.