जन्म आणि मृत्यू..
यामधला प्रवास..
दडलेली स्वप्नं..
आशा, निराशा, आनंदपूर्ती..
यात सामावलेलं बालपण, शिक्षण,
तरुणाई अन् पिकलेल्या पानाची छटा..
मागे वळून पाहिलं..
खूप वर्षे निघून गेली..
काही आठवतं..
काही विरून गेलं..
कुणासाठी रुसवा होता..
कधी विरहात सूख होतं..
घालमेल होती..
आपलं जग होतं...
सुगंध होता..
मित्र होती..
झोका होता..
जखमांवर फुंकर असायची..
आता काळ निसटत चालला..
असं वाटतं..
परवा परवापर्यंत सगळ काही होतं..
त्यालाही वर्षे निघून गेली..
भोगण्यात, उपभोगण्यात काळ गेला..
रुळावरच्या खिडकीबाहेर झाडे वेगात पळत आहेत..
विचारांना रोज नवीन पालवी फुटताना...
आशा जिवंत होत असते..
आज आहोत...
उद्या नसूही..
डोळ्यातील पाणी..
जगण्याचा झरा आहे.
ही दुनिया अनेकांची आहे..
उगवता सूर्य आपला आहे..
आपल्या डोळ्यांत आहे..
आपण चालतं रहावे,
प्रतीक्षा करताना,
सूख त्यात पहावे..
अन् शून्य होऊन जावे...
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)